

Maharashtra Political News
पुणे: राज्यात मुंबई आणि ठाणे वळगल्यास महायुती होईल, असे वाटत नाही. युती होणे थोडेसे अवघड आहे, झाली तर आनंदच आहे. त्यामुळे महायुती होईल, यावर अवलंबून राहू नका, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी केले.
पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात शिवसेना कार्यकर्ता मेळावा व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नीलम गोर्हे उपस्थित होत्या. या वेळी शिवसेनेचे महाराष्ट्र उपसचिव किरण साळी, संपर्कप्रमुख पूजा रावेतकर, नीलेश गिरमे, सुदर्शना त्रिगुणाईत, आयोजक बाळासाहेब मालुसरे, नितीन पवार, आनंद गोयल उपस्थित होते.
गोर्हे म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांची प्रभाग रचना अजून झालेली नाही. त्यामुळे ती होण्याची वाट पाहात बसण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी लोकसंपर्क वाढवायला हवा. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महायुती झाली तर आनंद होईल; परंतु त्यावर अवलंबून राहून नका.
समजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे काही ठरले, तर त्याप्रमाणे नियोजन होईल. जसे डीपीडीसीत ठरले आहे की 30-30 टक्के एकाकडे व 20 टक्के एकाकडे किंवा अजून काही मित्रपक्ष. त्यामुळे सर्वांचे काही ठरले तर आनंदाची बाब आहे. मात्र, यावर अवलंबून न राहता व बंडखोरीचा विचार सोडून आपापल्य कार्यक्षेत्रात जाऊन काम करण्यास सुरुवात करावी, असे गोर्हे म्हणल्या.
... महायुतीचं रुतलेलं चाक बाहेर येऊ शकले
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे रुतलेले चाक खर्या अर्थांनी बाहेर काढण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं आहे. त्यांच्या बळावर आपण निवडून आलो असून त्यांचा विश्वास कसा कायम ठेवायचा यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करायला हवे, असे देखील उपसभापती गोर्हे म्हणाल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मानले आभारविधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे काम केले. त्यांनी केलेल्या कामामुळे महायुतीतील सर्व घटकपक्षांना फायदा झाला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार या वेळी नीलम गोर्हे यांनी मानले.