एनडीएतील पदवीप्रदान समारंभाला कॅडेटच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती
आपल्या यशस्वी मुलांसाबेत आई-वडिलांनी अन् कुटुंबीयांनी काढले सेल्फी
पुणे : यशस्वी मुलांसोबत सेल्फी घेणारे आई-वडील... आपल्या नातीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणारे आजी- आजोबा... मुलांच्या यशाने आनंदलेले कुटुंबीय... असे उत्साहपूर्ण वातावरण गुरुवारी (दि. 29) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) पाहायला मिळाले. एनडीएच्या 148 व्या पदवीप्रदान समारंभाला आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय मोठ्या अभिमानाने जमले होते. एनडीएचे तीन वर्षांचे अवघड प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता खर्या अर्थाने सैन्यदलाची वाट मिळालेल्या एनडीएतील उत्तीर्ण कॅडेट्सच्या आई-वडिलांसाठी गुरुवारी अभिमानाचा क्षण होता. एनडीएतून उत्तीर्ण झालेल्या मुलींच्या पहिल्या तुकडीतील मुलींचेही यश पाहून त्यांच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले. पदवीप्रदान समारंभानंतर कुटुंबीय मुलांसोबतचे छायाचित्र, व्हिडीओ टिपत होते अन् नंतर काहींनी मुलांच्या यशाचे सेलिब—ेशनही केले.
एनडीए म्हणजे सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या स्वप्नाचे महत्त्वपूर्ण पाऊल... यंदा तर एनडीएतून उत्तीर्ण होणारी मुलींची पहिली तुकडी... हा ऐतिहासिक क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी आणि आपल्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पदवीप्रदान समारंभ झाला अन् त्यानंतर खर्या अर्थाने मुलांच्या आणि कुटुंबीयांच्या जल्लोषाला सुरुवात झाली. मुलांनी सभागृहाच्या बाहेर येऊन आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ- बहीण आणि कुटुंबीयांसोबत आनंद साजरा केला. काही कुटुंबीय तर त्यांच्या त्यांच्या प्रदेशातील पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. आपल्या मुलांसोबत सेल्फी, छायाचित्रे टिपून हा आनंदाचा क्षण आठवणींमध्ये कैद केला. विशेष म्हणजे वडिलांचा वारसा घेऊन सैन्यदलात आलेल्या मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांचे वडील सैन्यदलाच्या युनिफॉर्ममध्ये उपस्थित होते. यशाचा उत्साह, हर्षोल्हास अन् मुलांचे सेलिब—ेशन असे वातावरण येथे रंगले होते. एनडीए प्रशिक्षण आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण करणार्या मुलींच्या आई-वडिलांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.
हिमांशु चौधरी यानेही एनडीएचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. नवी उमेद घेऊन अन् हिमांशुचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या आईची आई आणि वडिलांची आई या दोघी जणी हिमांशुला यशाबद्दल कौतुक करण्यासाठी चक्क राजस्थानी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या. त्या राजस्थानमधून आल्या होत्या. या दोघींबरोबरच कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. दोन्ही आजींशी संवाद साधायला गेल्यावर त्या म्हणाला, आमचे छायाचित्र न घेता हिमांशुचे घ्या. कारण त्याने यश मिळवले आहे... हिमांशुला आशीर्वाद देत दोन्ही आजींनी त्याचे कौतुक केले. तसेच, त्याच्यासोबत छायाचित्रही टिपले.