बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत सध्या राजकीय गटबाजी निर्माण झाली आहे. गटबाजीचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. काही पदाधिकारी स्वतःलाच 'दादा' समजत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. कुरघोडीचे राजकारण वाढीस लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाबतीत बारामतीत सर्व काही आलबेल आहे, असे बाहेरून वाटत असले तरी आतून मात्र धुमसत आहे, ही बाब बारामतीच्या राष्ट्रवादीसाठी भविष्याकाळात धोक्याची घंटा मानली जात आहे.
बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. सर्वच प्रमुख संस्थांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे. विकासकामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोट्यवधी रुपयांचा निधी आणत आहेत; मात्र विकासकामांचा दर्जा ढासळला आहे. अधिकारी विकास कामांबाबत उदासीन आहेत. प्रमुख पदाधिकारी पक्ष कार्यालयात बसून कामांचे वाटप करत आहेत. त्यांचे ठेकेदारांशी असलेले संबंध नेहमीच बारामतीकरांना खटकणारे ठरले आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हेच ठेकेदार असल्याने अधिकारी आणि त्यांची मिलीभगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ठराविक पदाधिकार्यांनाच पुन्हा-पुन्हा संधी दिली जात असल्याने सर्वसामान्य जनता या पदाधिकार्यांना कंटाळली आहे. अजित पवारांसमोर पुढे-पुढे करणार्यांनाच पदावर संधी दिली जात असल्याने पक्षातील कार्यकर्ते व मतदारांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे.
राजकीय साठमारीत कार्यकर्त्यांची फरफट होत आहे. केवळ कुरघुड्यांचे राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीला तालुक्यात याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. नेतृत्वाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. गटबाजीच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फरफट होताना दिसत आहे. विकासाचा पॅटर्न म्हणून राज्यात आणि देशात ओळख निर्माण करणार्या बारामतीत छोट्या-छोट्या निवडणुकांना देखील अजित पवार यांना तळ ठोकून थांबावे लागत आहे. जर अजित पवार यांनाच सर्व काही करावे लागत आहे तर पदाधिकारी नेमके करतात काय, याची चाचपणी होणे गरजेचे आहे.
पदाधिकार्यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा आलेली निवेदने स्वतः पवार यांनी सर्वांसमोर वाचतात; मात्र त्यात सुधारणा होताना दिसत नाहीत. तालुक्यात व शहरात दोन ते तीन प्रमुख अशी राष्ट्रवादीची सध्याची अवस्था आहे. मात्र, त्यांच्यातही समन्वय नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. मर्जीतील कार्यकर्ते सांभाळण्यात पदाधिकारी व्यस्त आहेत, हा या गटाचा आणि तो त्या गटाचा म्हणत एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण केले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर आणि तालुक्यातील ठराविक पदाधिकार्यांवर मोठा विश्वास टाकला होता. कित्येक घराण्यात वारंवार पदे दिलेली आहेत; मात्र, ते पदाधिकारी विश्वासास पात्र आहेत की नाहीत याची खातरजमा होणे गरजेचे होते. अनेक वर्षे एकाच पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने आपल्याशिवाय कोणीच नाही अशी भावना काही पदाधिकार्यांच्या मनात निर्माण झाली आहे. खुनशी राजकारण्यांमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. पक्षाने संधी दिल्यानंतर स्वतःची घरे भरण्याचे काम पदाधिकार्यांनी केले. त्यामुळे संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो तरुण व कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे भाकरी करपण्याच्या आत फिरवण्याची गरज आहे.
तालुक्यातील ठेकेदारीमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वतःच्याच पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना संपवू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पदाधिकार्यांना संधी दिली त्याच पदाधिकार्यांनी व ठेकेदारांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याची भावना सर्वसामान्य जनतेची आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पदाधिकार्यांची उचलबांगडी करण्याची मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.
हेही वाचा