.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Baramati News: येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यात तरुण-तरुणींना संधी देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे उच्चांकी एक लाख मताधिक्याने निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत अनेक तरुण-तरुणींनी पवार यांच्या प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला होता.
पवार यांचे पुत्र जय आणि पार्थ पवार यांच्यासह अनेक तरुणांनी गावभेट दौर्यात सहभाग घेत निवडणुकीत पवार यांना मताधिक्य देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. तरुणाईने झोकून देत काम केल्याने मोठे यशही मिळाले. त्यामुळे आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उच्चशिक्षित तरुण-तरुणींना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तशी अपेक्षा अनेकांनी जय पवार यांच्याकडे व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती तालुक्यावर आता एकहाती वर्चस्व आहे. विविध संस्थांमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. काही कार्यकर्त्यांनी मात्र संधी देऊनही पक्षविरोधी कामे केली.
गाव नेत्यांच्या अकार्यक्षमतेला वैतागून व पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे अजित पवार यांना लोकसभेला मोठा फटका बसला. मागचा अनुभव लक्षात घेता पवार यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक गावात जात गाव भेटदौरा करत गावनेत्यावरील नाराजीचा मला फटका नको, असे आवाहन केले. मतदारांनी पवार यांची बाब मान्यही केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या विकासाला साथ देत त्यांना लाखाच्या फरकाने निवडून आणण्यात तरुण-तरुणींनी मोलाची कामगिरी बजावली. या निवडणुकीत महिला आणि तरुणांनी पवारांना मोठी साथ दिली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संधी मिळावी, अशी मागणी बारामती तालुक्यातून जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील अनेक पदाधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर चिटकून आहेत. ते कोणालाही जुमानत नाहीत. त्यांच्या मक्तेदारीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. सतत त्याच-त्याच पदाधिकार्यांना संधी मिळत असल्याने आणि तरुणांना संधी मिळत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे पवार यांनी सर्वसामान्य कुटुंबातील, उच्चशिक्षित तरुणांना संधी देत आता बदल घडवण्याची गरज आहे.
‘त्यांना’ खड्यासारखे बाजूला करणे आवश्यक
जय पवार यांनी तालुक्यात केलेल्या दौर्यात बदल करण्याचे सुतोवाच केले आहे. परंतु अंतिम निर्णय हा उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडेच आहे. तालुक्यासह शहरातही आवश्यक ते बदल पवार यांनी करावेत अशी मागणी आहे. अनेक संस्थांवर काम करणारे पदाधिकारी नागरिकांचे फोन घेत नाहीत. कामाच्या बाबतीत टोलवाटोलवी करतात, पवार आले की त्यांच्या पुढे-पुढे करतात. ते बारामतीतून बाहेर पडले की बारामतीचे आपणच दादा या थाटात वावरतात, अशांनाही खड्यासारखे बाजूला करणे आता गरजेचे झाले आहे.