

Pune News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जसे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, तसे ते माजी मंत्री छगन भुजबळ यांचेही आहेत. असे असताना भुजबळ यांचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन करतात. अशा कार्यकर्त्यांना भुजबळ यांनी समजावून सांगावे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने पुण्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोस जोडे मारण्याचे आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला. ते म्हणाले, अजित पवार यांनी आत्तापर्यंत विविध जाती-धर्मांच्या लोकांना संधी देऊन पुढे आणले आहे.
भुजबळ यांना पक्षाने खूप काही दिले आहे. त्यांच्या मुलाला काही महिन्यांपूर्वीच विधान परिषदेवर संधी दिली आहे. सगळी पदे त्यांच्याच घरात दिली, तर इतरांनी काय करायचे? ते स्वतःला ओबीसीचे नेते समजत असले तरी राज्यात इतरही ओबीसी नेते आहेत.
अजित पवार यांनी चार ओबीसी नेत्यांना मंत्रिपदावर संधी दिली आहे. मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास किंवा त्यांना विरोध करण्यास अजित पवार यांनी भुजबळ यांना सांगितले नव्हते. त्यामुळे मंत्रिपद न देण्यामागे जरांगेविरोधाचा मुद्दा नाही.
दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात का? याबाबत मानकर म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. त्याचे आम्ही स्वागतच करू.