

पुणे : बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुन्हा २५ रोजी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गत २४ तासांत मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकुळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बंगालच्या उपसागरावर सोमवारी कमी दाबाचे तयार झाले. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. बुधवार (दि. २४) आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मान्सूनचा परतीचा प्रवास गुजरात पर्यंत आला असून तो तेथे गत तीन दिवसांपासून पाऊस देत आहे. तेथून तो महाराष्ट्रात कधीही येऊ शकतो त्यामुळे संपूर्ण नवरात्रात राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.
मान्सून परतीच्या प्रवासात यंदा खूप जास्त पाऊस देत निघाला आहे. पूर्व राज्स्थान ते गुजरात पर्यंत येण्यास दहा दिवसांचा कालावधी लागला. या प्रवासात मान्सून धो-धो बरसत येत आहे. सोमवारी मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाना आणि पंजाबच्या काही भागांमधून परतला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार मंगळवारी (दि. २३) कोकण, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२६ पासून विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
२७ रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होईल.
२८ रोजी राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: सायंकाळी बाहेर पडताना काळजी घ्यावी.असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
- कोकणः मुसळाधार (२३,२४),अतिवृष्टी (२५ ते २७ )
- मध्यमहाराष्ट्रः मुसळधार (२६ ते २८)
-मराठवाडा: मुसळधार (२३,२६,२७)
- विदर्भः मुसळधार (२४),अतिमुसळधार (२५ ते २८)