Narayangaon News | अतिक्रमणे हटवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार: नारायणगावची ग्रामसभा पोलिस बंदोबस्तात!

Narayangaon News | अतिक्रमणे हटवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार:  नारायणगावची ग्रामसभा पोलिस बंदोबस्तात!
Narayangaon News | अतिक्रमणे हटवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार: नारायणगावची ग्रामसभा पोलिस बंदोबस्तात!
Published on
Updated on

नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच पोलिस बंदोबस्तात पार पडली. या ग्रामसभेत विविध विकासकामांसह अतिक्रमणांसह कचऱ्याबाबत वादळी चर्चा झाली. या वेळी नागरिकांची संतप्त भावना लक्षात घेऊन गावातील अतिक्रमणे हटवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

येथील मुक्ताबाई समाज मंदिरात उपसरपंच योगेश पाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटविणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्यांची भाडेवाढ न करणे, तसेच गॅस शवदाहिनीमध्ये अंत्यविधीसाठी किमान एक हजार रुपये शुल्क आकारणे, आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

ग्रामसभेच्या सुरुवातीला कनिका खैरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आरोप केल्याने वाद निर्माण झाला. या वेळी पोलिस उप निरीक्षक जगदेव पाटील यांनी वैयक्तिक विषय न घेता सभा शांततेचे आवाहन केले. त्यानंतर वाद शांत झाला. दरम्यान, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे यांच्या सूचनेनुसार तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी किशोर खैरे, उपाध्यक्षपदी सागर दरंदाळे, तर सचिवपदी ॲड. राजेंद्र कोल्हे यांची निवड करण्यात आली.

सभेत पूर्व वेस येथील महापुरुषांचे पुतळे, फास्ट फूड व हॉटेलमध्ये वापरले जाणारे हानीकारक पदार्थ, मैला गाळ प्रकल्प, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, विविध विकासकामे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, गाळा जागाभाडे, शासकीय जागेवरील अतिक्रमणे, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड आणि दलितवस्ती सुधार योजना आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

ग्रामसभेतील प्रश्नांना उत्तर देताना अध्यक्ष योगेश पाटे म्हणाले, की नारायणगाव परिसरातील रस्त्यांची कामे केली जातील. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह आवश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येतील. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, तसेच ग्रामस्थांनी सुचविलेली विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ग्रामसभेस सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, जिल्हा परिषद सदस्या नेहा पाटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खैरे, अशोक पाटे, संतोष वाजगे, सुषमा वाव्हळ, आशिष माळवदकर, अक्षय खैरे,अजित वाजगे, नामदेव खैरे, कनिका खैरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सचिव म्हणून मच्छिंद्र जगताप यांनी काम पाहिले. राजश्री बोरकर, संतोष खैरे, सुजित खैरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले.

ग्रामस्थांच्या विविध मागण्या

शेतशिवारातील रस्त्यांची व बंदिस्त गटारांची दुरुस्ती, घनकचरा व सांडपाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, गावठाणातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, रुग्णालयातील जैविक कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, पडझड झालेल्या जुन्या घरकुलांच्या जागी नवीन घरकुले उभारावीत, खोडद रस्त्यावर पथदिवे आणि क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करणे, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news