सुवर्णा चव्हाण
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जुनी छायाचित्रे... त्यांनी महात्मा गांधी यांना लिहिलेले पत्र... ‘मूकनायक’चा जुना अंक... अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास उलगडणार्या विविध वस्तू पाहायला मिळाल्या तर आनंद होईलच. हो, हे खरंय... पुण्यातील मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे बौद्ध इतिहास आणि संस्कृती संशोधन संस्था संचालित नागार्जुन संग्रहालय आहे.
या संग्रहालयात डॉ. आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व उलगडणार्या विविध वस्तू असून, दिवंगत दिलीप वानखेडे यांनी जमा केलेल्या वस्तूंचा संग्रह येथे आहे. या संग्रहालयाने नुकतीच 25 वर्षे पूर्ण केली आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित असेच एक संग्रहालय आता नागपूरच्या कामठी येथील घोरपड गावात उभारण्यात येणार असून, वानखेडे कुटुंबीयांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
तीस वर्षांच्या कष्टाने दिलीप वानखेडे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध मूर्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक जुनी छायाचित्रे, वस्तू संग्रहित केल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2000 साली पुण्याचे तत्कालीन आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पुणे महानगरपालिकेद्वारे नव्याने बांधण्यात येणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे नागार्जुन संग्रहालयास कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिली आणि वानखेडे यांनी संग्रहालयाची सुरुवात केली.
आजही दुर्मीळ वस्तूंचा हा खजिना पाहावयास खुला असून, त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे कार्यकर्तृत्व या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहचत आहे. वानखेडे यांनी बरीच वर्षे संग्रहालयाचे काम पाहिले.
1 एप्रिल 2021 साली त्यांचे निधन झाले. आता त्यांची पत्नी कल्पना, त्यांचे पुत्र कुलदीप आणि हर्षवर्धन वानखेडे हे संग्रहालयाचे काम पाहत आहेत. या संग्रहालयाला अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन वानखेडे कुटुंबीयांनी केले आहे. सोमवारी (दि. 14) साजर्या होणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दै. ’पुढारी’ने याविषयी जाणून घेतले.
याविषयी दिलीप वानखेडे यांच्या पत्नी कल्पना वानखेडे म्हणाल्या की, दिलीप यांना लहानपणापासून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली. त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, त्यांच्यावरील पुस्तके, चित्रे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके आणि छायाचित्रे गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गावोगावी जाऊन स्वखर्चाने त्यांनी प्रदर्शन भरवायला सुरुवात केली.
पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील जागा त्यांना संग्रहालयासाठी मिळाली. एका मूर्तीपासून सुरू झालेल्या या प्रवासाचे रूपांतर पुढे संग्रहालयात झाले. वानखेडे आता या जगात नाहीत. पण, त्यांचा हा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. डॉ. आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ज्येष्ठ संग्राहक दिलीप वानखेडे स्थापित बौद्ध इतिहास आणि संस्कृती संशोधन संस्थेमार्फ त चालवल्या जाणार्या या संग्रहालयास मार्गदर्शक नागदिपंकर भन्ते आणि संस्थेचे सभासद यांचे सहकार्य लाभत आहे.
संग्रहालयात डॉ. आंबेडकरांच्या या वस्तू
नागार्जुन संग्रहालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 600 हून छायाचित्रे, त्यांच्या वापरातील वस्तू, पत्र, खंड, पुस्तके असा मोठा संग्रह आहे. पुणे करारापासून ते विविध परिषदांमधील डॉ. आंबेडकरांची छायाचित्रे, त्यांनी विविध व्यक्तींना लिहिलेली पत्रे, अशा विविध वस्तू संग्रहालयात आहेत. पुणे रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्का चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे हे संग्रहालय असून, सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत हे संग्रहालय सुरू असते. संग्रहालयात प्रवेश विनामूल्य आहे.