

ओतूर: नगर-कल्याण महामार्गावर उदापूर गावच्या हद्दीत हॉटेल निमंत्रणसमोर रविवारी (दि. २१) दुपारी १ ते १.२० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील वडील आणि ३ वर्षीय मुलगी अशा दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे या भीषण अपघातात मृतांमध्ये ३ वर्षांची चिमुकलीचा समावेश असून पाच महिन्यांचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले आहे, या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ एमआर ८८६७ क्रमांकाचा आयशर ट्रक नारायणगाव येथून टोमॅटो भरून कल्याणच्या दिशेने जात होता. त्याचवेळी एमएच १७ डीडी ३२१५ या स्प्लेंडर दुचाकीने मढकडून आळेफाट्याकडे एक कुटुंब जात होते. यावेळी उदापूर गावच्या हद्दीत हॉटेल निमंत्रण समोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या भीषण अपघातात दुचाकीवरील अजय बबन दूधवडे (वय २१) आणि अनुजा अजय दूधवडे (वय ३) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तनुजा अजय दूधवडे (वय ५ महिने),सलोनी अजय दुधवडे (वय १९) गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातात कुटुंबातील अवघे पाच महिन्यांचे बाळ देखील जखमी झाले होते. मात्र, सुदैवाने त्या चिमुकल्याचा जीव वाचला असून ही बाब अनेकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांचे मार्गदर्शनात पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यावर पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.