

पुणे : नर्हेतील म्हसोबा मंदिरासमोरील गायकवाड बिल्डिंगमध्ये एका व्यक्तीचा तोंडावर बकेट मारून आणि चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. राजू दादू आरू (वय 42, रा. गोंदवले नाका, श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अनिल अशोक जाधव (वय 38, रा. गायकवाड बिल्डिंग नर्हे गाव, मूळ श्रीरामपूर) याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Pune News Update)
ही घटना मंगळवारी (दि.17) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, अनिल याने राजू याचा खून कोणत्या कारणातून केला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. अनिल हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे म्हणाले, आरोपी अनिल हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. राजू हा एका हॉटेलमध्ये काम करतो. तो अधून-मधून पुण्यात येत असतो. मंगळवारी तो अनिलच्या घरी आला होता. अनिल याने त्याच्या तोंडावर लोखंडी बकेट मारून, चाकूने सपासप वार करून खून केला. हा प्रकार निदर्शनास येताच तेथील काही व्यक्तींनी सिंहगड रोड पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी राजू याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. शवविच्छेदनासाठी राजू याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला होता. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.