पुणे: शहरात आरओ प्लांट चालविण्यासाठी महापालिकेने आता नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार आरओ प्लांटमधील पाणी पिण्यास योग्य आहे का? याबाबत राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि पुणे महानगरपालिका प्रयोगशाळेकडून पाण्याची तपासणी करून घेऊन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. याशिवाय अन्य काही अटींचा समावेश असून, त्यांची पूर्तता केल्यानंतरच सील ठोकण्यात आलेले आरओ प्लांट सुरू करता येणार आहेत.
सिंहगड रस्ता परिसरातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीबीएस या आजाराची साथ पसरली होती. प्रामुख्याने या भागातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने जीबीएसचा प्रसार झाल्याचे तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर महापालिकेने संबंधित भागाला महापालिकेच्या टँकरच्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला.
दरम्यान, महापालिकेने केलेल्या तपासणीत या भागातील आरओ प्लांट प्रकल्पातून देण्यात येणारे पाणीही दूषित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सिंहगड रस्ता परिसरातील 30 आरओ प्लांटला सील करून टाळे ठोकले होते.
मात्र, हे आरओ प्लांट सुरू करण्याबाबत नक्की काय कार्यवाही करायची, याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे महापालिकेने आता शहरातील सर्वच भागांतील आरओ प्लांट प्रकल्पांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यासंबंधीचे आदेश प्रशासनाने दिले असून, त्याची पूर्तता आता आरओ प्लांटचालकांना करावी लागणार आहे.
आरओ प्लांटसाठीची नियमावली
खासगी आरओ प्लांटधारकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह मुख्य अभियंता पाणीपुरवठा यांच्याकडे अर्ज करायचा आहे. आरओ प्लांटमालकांनी त्यांच्या मूळ उत्पादक कंपनीकडून किंवा प्लांट दुरुस्त करणारी संस्था यांच्याकडून प्लांटची देखभाल दुरुस्ती करून घेऊन त्याबाबतचा दाखला संबंधित कंपनीकडून घ्यावा. तसेच, देखभाल दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू असतानाचे सुस्पष्ट, तारीख, वेळ व जिओ टॅगसह फोटो काढावेत.
मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लांट दुरुस्त करणारी संस्था यांच्याकडून सदर प्लांटच्या आउटलेटचे पाणी थकज/खड 10500 (2012) नुसार शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा.
राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पुणे महापालिका प्रयोगशाळेकडून सदर आरओ प्लांटद्वारे येणारे पाणी पिण्यास योग्य आहे, याबाबत तपासणी करून घेण्यात यावी व त्याप्रमाणे अहवाल त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावा. प्लांटसाठी पुणे महापालिकेचे पाणी वापरत असल्यास सदर नळजोड नियमान्वित करून बिगर घरगुती दराने मीटरवर सदर पाण्याचे बिल मनपाकडे भरावे.
आरोग्य निरीक्षकांना तपासणीचे अधिकार
महापालिकेच्या ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आरओ प्लांट आहे. त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक यांनी संबंधित प्लांटचे वेळोवेळी नमुने घेऊन त्यांची तपासणी करावी व पाणी पिण्यास अयोग्य आढळल्यास सदर प्लांट बंद करण्याबाबत कारवाई करावी, असे आदेशही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.