जुन्या वाहनांच्या विक्रीतून महापालिका मालामाल

15 वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी रद्द झाल्याने निर्णय
Pune Municipal Corporation
जुन्या वाहनांच्या विक्रीतून महापालिका मालामालFile Photo
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेने जुनी वाहने विक्रीस काढली असून, या वाहनांच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 15 वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी रद्द होत असल्याने पालिकेने ही वाहने विक्रीस काढली आहेत. वाहन विक्रीतून सहा कोटी 85 लाख, तर वाहनांच्या सुट्या भागांच्या लिलावातून तीन कोटी 35 लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे.

केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपूर्वी स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीअंतर्गत 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. पुणे महापालिकेकडे काही वाहने 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत. ही जुनी झालेली वाहने गुलटेकडी, कोंढवा व हडपसर येथील वाहन विभागात ठेवलेली होती. जुन्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ही वाहने ठेवण्यासाठीची जागा कमी पडत होती. त्यामुळे पालिकेने या वाहनांचा लिलाव करण्याचे ठरवले होते.

महापालिकेने टप्प्याटप्याने या जुन्या वाहनांचा लिलाव करण्यास सुरुवात केली आहे. चारचाकी वाहनांच्या नुकत्याच झालेल्या लिलावातून पालिकेला सहा कोटी 85 लाख रुपयांचे, तर जुन्या वाहनांच्या सुट्या भागांच्या लिलावातून देखील पालिकेला मोठी रक्कम मिळाली आहे.

यात टायर, हायमास्टचे पोल, दवाखान्यातील खाटा, पथ विभागाच्या साहित्याची विक्री यातून तीन कोटी 35 लाख रुपये मिळाले, अशी माहिती महापालिकेच्या वाहन विभागाचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी दिली. तसेच, पुढील 15 दिवसांनंतर पुन्हा ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती भोसेकर यांनी दिली.

दोन वर्षांत 473 वाहने सेवेतून बाद

महापालिकेने गेल्या 2 वर्षांपासून 473 वाहने सेवेतून बाद केली. पुणे पालिकेच्या वाहन विभागाकडे 1 हजार 163 इतकी वाहनांची नोंद असून, ही वाहने महापालिकेच्या प्रमुख अधिकार्‍यांसह घनकचरा विभाग, पाणीपुरवठा, अग्निशामक दल यासह विविध भागांत सेवा देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news