महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी! सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणार

महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी! सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका कर्मचार्‍यांसाठी गोड बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे महापालिका कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या थकीत तिसर्‍या टप्प्यातील रक्कम प्रशासनाकडून लवकर देण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून, अधिकारी, कर्मचार्‍यांची बिले तपासून त्यासंबंधीची कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त विभागाने दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाने शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम ही पाच टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आत्तापर्यंत दोन टप्प्यांत ही रक्कम देण्यात आली आहे.

आता तिसर्‍या टप्प्यातील रक्कम देण्यासाठी पालिकेच्या मुख्य लेखा विभागाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार सर्व कर्मचार्‍यांची तिसर्‍या हप्त्याची बिले दि. 27 मेपर्यंत ऑडिट विभागाकडून तपासून घ्यावीत, तसेच अधिकारी, कर्मचारी 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झाले आहेत, असे कर्मचारी व मयत कर्मचार्‍यांचे वारस यांना सेवानिवृत्ती दिनांकापर्यंतची बिले ऑडिट विभागाकडून तपासून घ्यावीत, अशा सूचना मुख्य लेखापाल विभागाने दिल्या आहेत. तसेच, तिसर्‍या हप्त्यासाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेली 125 कोटी रुपयांची तरतूद अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सादर केलेल्या बिलांनुसार खर्ची टाकण्याचे आदेशही सहआयुक्त व मुख्यलेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी दिले आहेत.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news