

पुणे, पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. दि. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक ण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)
द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे.