

Mumbai Pune Expressway mega block
पुणे : पुणे-मुंबई दरम्यानच्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळील डोंगरगाव-कुसगाव येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढण्यासाठी तसेच रंगकामासाठी गुरुवार (दि. २३ एप्रिल) आणि शुक्रवार (दि. २४ एप्रिल) रोजी या मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि. २३ एप्रिल) पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद राहील. ही वाहने किवळे-देहूरोड-तळेगावमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून कुसगाव टोल प्लाझाकडे वळविण्यात येतील. तर, शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत बंद असेल. ही वाहने कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून देहू रोड-किवळेमार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.
वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) केले आहे. मदतीसाठी नियंत्रण कक्ष (९८२२४९८२२४) किंवा महामार्ग पोलीस (९८३३४९८३३४) यांच्याशी संपर्क साधावा.