मुंबई-होस्पेट एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने दौंड रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस दीड तास थांबवून ठेवण्यात आली. लोहमार्ग पोलिस व आरपीएफच्या पथकाने रेल्वेतील डब्यांची कसून तपासणी केली असता कोणताही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश वस्तू न आढळल्याने प्रशासनासह प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बुधवारी (दि.20) पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला.
मुंबई -होस्पेट एक्स्प्रेस (11139) पुण्याहून मार्गस्थ झाल्यानंतर या गाडीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन लोहमार्ग पोलिसांना आला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. ही गाडी दौंड स्थानकात आल्यानंतर कर्तव्यावरील पोलिस जवान रूपेश साळुंखे, सुनील मराठे यांनी ही गाडी स्थानकात थांबवून ठेवली. त्यानंतर दौंड रेल्वे प्रशासन, लोहमार्ग पोलिस, आरपीएफ आणि श्वान पथकाने या रेल्वेची कसून तपासणी केली.
सुमारे दीड तास ही तपासणी सुरू होती. डबा क्रमांक डी 1, डी 2, डी 3, डी 4 यासह जनरल डब्याची कसून तपासणी करण्यात आली. परंतु, या गाडीमध्ये कोणतीही बॉम्ब सदृष्य वस्तू आढळली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनासह पोलिसांनी आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, बॉम्बबाबतच्या निनावी फोनमुळे रेल्वे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. सुमारे दीड तासानंतर ही गाडी दौंड स्थानकातून होस्पेटकडे रवाना करण्यात आली.