

Pune News: राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहेत. परंतु, वयोमर्यादा ओलांडल्याने काही विद्यार्थ्यांच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले होते. मात्र, आता या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण, राज्य सरकारने एमपीएससी सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या हजारो उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच एमपीएससीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या जाहिरातीमध्ये बदल करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश करण्याचे आदेश दिले.
सुधारित जाहिराती प्रसिद्धीस आयोगाला 2024 च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंब झाला आहे. परिणामी, वयोमर्यादा ओलांडल्याने हजारो उमेदवार भरती प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. या निर्णयामुळे अशा उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. एमपीएससीच्या 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.