वाल्हे: पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
वाल्हे येथील वागदरवाडी फाटा (ता.पुरंदर) येथील भुयारी मार्गाची पाहणी सुळे यांनी पदाधिकाऱ्यांसह केली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी नागरिकांनी विविध अडचणी सांगून त्यातून मार्ग काढण्याची मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणाचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन सुळे यांनी नागरिकांना दिले. (Latest Pune News)
राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली असून, महाराष्ट्र सरकारला तशा सूचना देण्याची विनंती केली आहे, असे सुळे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या कामकाजावर त्यांनी टीका केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबवणे हे सरकारचे अपयश आहे. सरकारचे पैसे कुठे जातात? कारभारात गोंधळ का आहे? 25 लाख लाडक्या बहिणींची नावे का वगळली? याची उत्तरे सरकारने द्यावीत, असे सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, वाल्हे येथील उड्डाणपूल, भुयारीमार्ग चुकीच्या पद्धतीने झाल्याचे नागरिकांनी सांगितले. वाल्हे, पिंगोरी, हरणी, मांडकी, वीर, परिंचे, माहूर, मांढर, सारोळा, शिरवळ आदी गावांना जोडणारा मार्ग उड्डाणपुलामुळे बंद झाला आहे. तो खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली.
नव्याने मोठा भुयारीमार्ग काढावा, वागदरवाडी फाटा येथील भुयारीमार्ग मोठा करावा, पाण्याच्या टाकीजवळ भुयारीमार्ग करावा आदी मागण्या नागरिकांनी केल्या. पालखी मार्ग चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप बाळासाहेब भुजबळ यांनी केला. सुळे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, पुणे जिल्हा सरचिटणीस विजय कोलते, सुदाम इंगळे, बबुसाहेब माहुरकर, दत्ताआबा चव्हाण, राहुल गिरमे, माजी सरपंच महादेव चव्हाण, संभाजी पवार, गिरीष पवार, ॲड.फत्तेसिंह पवार, वाल्हेचे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, पिंगोरीचे सरपंच संदीप यादव, पोपट पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.