

वैभव धाडवे पाटील
पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या पुनर्रचनातून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या जोरदार हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत 26 जानेवारी रोजी घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चेस जोर आला आहे.
बारामती, शिरूर, माढा लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यांचा समावेश करून बारामती जिल्हा केला जाणार आहे. यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग म्हणजे भोर, पुरंदर, शिरूर, दौंड, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याविषयी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका दुहेरी आहे. काहीजण सकारात्मक व काही नकारात्मक आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती जिल्हापूरक अशा बाबींमध्ये महावितरणचे विभागीय मुख्यधिकारी कार्यालय, स्वतंत्र परिवहन महामंडळ कार्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय याचबरोबर बारामती जिल्हा शोभेल असे सर्व बाजूंचे चौपदरी रस्ते, विमानतळासाठी जागा, मेडिकल का?लेजसह शैक्षणिक हब, कृषी हब, सर्व क्षेत्रांतील नामवंत सोने व्यापारी, हॉटेल्स, कापड दुकानदार, गाडी विक्रेते, औद्योगिकरणाचे जाळे, बारामती शहरातील रिंगरोड, 27 बाग-बगिचे येथे उपलब्ध आहेत. आता फक्त बारामतीला जिल्हा मानाकंन देऊन जाहीर करण्याचे उरले आहे.
बारामती जिल्हा निर्मितीमुळे अनेक तालुक्यांचे रखडलेले प्रस्तावही मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही तालुक्यांचा राजकीय कुरघोडी, डावपेच करून दबावात ठेवण्यासाठी तर काहीचा तालुक्याचा फायदादेखील होणार आहे. याबाबत सकारात्मक व नकारात्मक दोन्ही चर्चा सध्या जोरात आहेत.