पुणे: वडगाव शेरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या तरी, पाण्याची समस्या अद्याप सुटली नाही. त्यामुळे सोमनाथनगर परिसरातील महिला आणि नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
वडगाव शेरी परिसरातील धनलक्ष्मी सोसायटी, ग्रेवाल सोसायटी, सुनीतानगर, सोमनाथनगरचा परिसर या भागात गेल्या दोन महिन्यांपासून अपुर्या, कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत तक्रार केली होती.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी या भागाला अनेक वेळ्या भेटी दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, तरी ही समस्या अद्याप सुटली नाही. त्यामुळे अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पाण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि मोठी जलवाहिनी टाकली जात नाही, तोपर्यंत या भागातील नागरिक आणि महिला दररोज एक तास धरणे आंदोलन करणार आहेत.
वडगाव शेरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणी प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत नागारिक आणि महिला दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत आंदोलन करणार आहोत.
- राजेंद्र साळवे, अध्यक्ष, अखिल मांजराईनगर कृती समिती