

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : खासगी आराम बसचा विमा संपला असताना त्याऐवजी दुचाकीचा विमा काढून खासगी बसचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला.
याप्रकरणी चार संचालकांच्याविरोधात सव्वाचार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आकुर्डी येथे घडला आहे.
एसकेएसएलटी आणि एसकेएसपीएल या कंपनीचे संचालक महेश खेडकर, राघवेंद्र खेडकर, हेमंत खेडकर, चिंतामणी खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी समर्थ विपीनशंकर झा (वय 26, रा. वडोदरा, गुजरात) यांनी मंगळवारी (दि. 1) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 22 ऑक्टोबर 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसकेएसएलटी आणि एसकेएसपीएल या कंपनीत फिर्यादी समर्थ झा आणि कोमल शहा यांची 60 टक्के भागीदारी आहे.
कंपनीच्या चार संचालकांनी फिर्यादी आणि शहा यांच्या परवानगीशिवाय कंपनीच्या 18 लक्झरी बसेस पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी हलवल्या.
बसेसचे इन्शुरन्स संपले असताना लक्झरी बसेऐवजी होंडा ऍक्टिवा या दुचाकीचे एचडीएफसी एरगो या इन्शुरन्स कंपनीकडून बनावट इन्शुरन्स काढले.
त्याआधारे लक्झरी बसेसचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून फिर्यादी समर्थ झा आणि कोमल शहा यांची तब्बल चार कोटी 23 लाख 23 हजारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.