

पुणे: पीएमपीने आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पाऊल टाकून, तिकीट पासची ऑनलाइन विक्री होण्यासाठी ‘आपली पीएमपीएमएल’ हे अॅप सुरू केले आहे. या अॅपला पुणेकर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या अॅपचे सहा लाखांपेक्षा अधिक वापरकर्ते झाले आहेत.
त्याद्वारे प्रशासनाला दररोज 20 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. आगामी काळात याचे वापरकर्ते वाढून पीएमपी कॅशलेस होईल, असा विश्वास पीएमपी अधिकार्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पीएमपीकडे ओला, उबेरप्रमाणे स्वत:चे अॅप असावे, प्रवाशांना तंत्रज्ञानाच्या युगात पीएमपीकडूनही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हावी अन् पीएमपीतील सर्व व्यवहार कॅशलेस व्हावा, याकरिता दै. ‘पुढारी’कडून सातत्याने वृत्त प्रसिध्द करून अॅप आणि ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.
अखेर त्याची प्रशासन पातळीवर दखल घेत हे अॅप सुरू झाले. पीएमपीने कात टाकत, तंत्रज्ञानाच्या युगात आपले पाऊल ठेवले. सध्या या अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सहा लाखांपेक्षा अधिक याचे वापरकर्ते झाले असल्याचे पीएमपीच्या अधिकार्यांनी सांगितले.
आयफोनधारकांसाठी आयओएस व्हर्जन
पूर्वी पीएमपीएमएलचे अॅप फक्त अँड्रॉइड फोनमध्येच चालत होते. प्ले स्टोअरवर ते अँड्रॉईड मोबाईल वापरणार्यांसाठी उपलब्ध होते. मात्र, आयफोन वापरणारे प्रवासी या अॅपपासून वंचित होते. त्यांच्यासाठी पीएमपीने नुकतेच या अॅपचे आयओएस व्हर्जन सुरू केले आहे. त्यामुळे आयफोन वापरणार्यांनादेखील या अॅपचा लाभ घेता येत आहे.
पीएमपी अॅपचे फायदे
सर्व बसमार्गांची माहिती समजते.
बसचे लाइव्ह लोकेशन समजते, लाइव्ह ट्रॅकिंग होते.
बस थांब्यावर किती वेळात येणार, हेदेखील समजणे शक्य झाले आहे.
ऑनलाइन तिकीट काढता येते.
दैनंदिन पासदेखील काढता येतो. प्रवाशांना 40, 50 व 120 रुपयांचे दैनंदिन पास काढता येतात.
मोबाईल अॅपवरून प्रवाशांना त्यांच्या तक्रारीदेखील नोंदविता येतात.
आपली पीएमपीएमएल मोबाईल अॅपवरून मेट्रो तिकीटदेखील काढता येतात.
आपली पीएमपीएमएल या आमच्याकडील अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे अॅप सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सहा लाखांपेक्षा अधिक डाऊनलोडर्स (वापरकर्ते) झाले आहेत. दिवसाला या अॅपच्या माध्यमातून आम्हाला 20 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.
- दीपा मुंडे-मुधोळ,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
पीएमपीने अॅप तयार केल्यामुळे आमच्यासारख्या प्रवाशांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समजत आहे. मात्र, यूपीआयप्रमाणे आगामी काळात या अॅपला कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये. आलीच तर तिचे तत्काळ निवारण करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी, अशी प्रवासी म्हणून आमची अपेक्षा आहे.
- सागर शिंदे, प्रवासी