महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने 143 गावांमधील 4 हजार 329 शेतकर्यांना बाधित केले आहे. यामुळे 1,238.31 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 2 कोटी 10 लाख 51 हजार 700 रुपयांच्या नुकसानभरपाईचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.
लोणी, कुरवंडी, चास, नारोडी, लौकी आणि चांडोली-गिरवली या भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे बाजरी, भुईमूग, पालेभाज्या, कोथिंबीर, शेपू, टोमॅटो आणि फ्लॉवर या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीयोग्य बाजरी काळी पडली, वैरण सडून गेली आणि कणसांना मोड फुटले. आंबा व जांभळासारख्या फळबागांनाही मोठा फटका बसला.(Latest Pune News)
राज्य शासनाच्या आदेशानुसार, महसूल विभागाच्या तहसीलदार यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना दिल्या होत्या. त्यानुसार, अधिकारी-कर्मचार्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे केले आहेत. या भरपाईमध्ये फळबागांना हेक्टरी 22 हजार 500 रुपये, बागायत पिकांना 17 हजार रुपये, तर जिरायत पिकांना 8 हजार 500 रुपये नुकसानभरपाई देण्याचे प्रस्तावित आहे. अजूनही काही गावांचे पंचनामे बाकी असून, बाधित शेतकर्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळेल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. बांधावर जाऊन अधिकार्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.
- दिलीप वळसे पाटील, माजी सहकारमंत्री व आमदार