पुणे: पेठांमधील अरुंद जागेमुळे लक्ष्मी रोड तसेच या परिसरात खरेदीसाठी येणार्या नागरिकांना त्यांची वाहने उभी करताना सोयीचे व्हावे, यासाठी महानगरपालिकेतर्फे नारायण पेठेत हमालवाडा वाहनतळ उभारण्यात आले. मात्र, स्थानिक नागरिकांनी महिन्याचा पास घेऊन या वाहनतळाचा खासगी वाहनतळाप्रमाणे वापर केला जात असल्याचे दै. ’पुढारी’च्या पाहणीत आढळून आले. या ठिकाणी दरपत्रकदेखील लावण्यात आलेले नाही तसेच दुचाकी लावल्यास त्यांना पावतीदेखील दिली जात नाही.
हमालवाडा वाहनतळ पाचमजली आहे. तळमजल्यापासून ते पाचव्या मजल्यावर चारचाकी वाहने येथे पार्क केली जातात, तर तळमजल्यावर दुचाकीदेखील पार्क केल्या जातात. प्रवेशद्वारावरच वाहन लावल्यावर पावती दिली जाते. दुचाकीसाठी तासाला 10 रुपये व चारचाकीसाठी देखील 10 रुपये या ठिकाणी आकारले जातात. (Latest Pune News)
मात्र, वाहनतळाच्या कोणत्याही ठिकाणी शुल्काचे दरपत्रक लावलेले नाही. या ठिकाणी दुचाकी लावल्यास 10 रुपये घेतले जातात. मात्र, त्याची कोणतीही पावतीही दिली जात नाही. त्यामुळे हा पैसा थेट ठेकेदाराच्या खिशात जात आहे.
या वाहनतळात अनेक गाड्या नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. या गाड्यांचा कोणी वाली नाही, असे चित्र आहे. येथे काही गाडेदेखील उभे करण्यात आले आहेत. जागोजागी कचरा पडून असून, याची कोणतीच देखरेख केली जात नाही, असे चित्र होते.
चारचाकीच्या महिन्याच्या पाससाठी मोजावे लागतात सहा ते साडे सहा हजार; दुचाकींना 750 रुपये, हा पेठांचा हा परिसर आहे. येथे बाजारपेठदेखील असल्याने येथे खरेदीसाठी संपूर्ण पुण्यातून व बाहेरूनदेखील नागरिक खरेदीसाठी येत असतात. हे नागरिक येथे वाहने लावतात. काही जण महिन्याचा पास घेऊन या ठिकाणी वाहने उभी करतात. यासाठी त्यांना सहा ते साडेसहा हजार मोजावे लागतात. दुचाकीसाठी 700 ते 750 रुपये मोजावे लागतात.
स्थानिक नागरिकांकडून मोठा वापर
या परिसरात अनेक फ्लॅटधारकांना स्वत:चे पार्किंग नाही. त्यामुळे त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात या वाहनतळाचा उपयोग केला जात असल्याचे आढळले. या वाहनतळात अनेक दिवसांपासून पार्क करण्यात आलेल्या चारचाकी देखील आढळल्या. तर काही चारचाकींना कव्हरदेखील घालण्यात आले आहे. काही गाड्या तर धूळ खात अनेक वर्षांपासून या ठिकाणी उभ्या असल्याचे आढळले.