Monsoon | अंदमानात मान्सून आगमनाची सुचिन्हे

अंदमान-निकोबार बेटांवर 21 ते 25 मेदरम्यान दाखल होण्याची शक्यता
Monsoon |
Monsoon | अंदमानात मान्सून आगमनाची सुचिन्हे
Published on
Updated on

पुणे : अंदमान बेटांवर मान्सूननिर्मितीला सुरुवात झाली आहे. देशात सर्वत्र वार्‍यांचा वेग वाढला आहे. अंदमान बेटांवर मान्सून 21 ते 25 मेदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेसह धुळीचे वादळ सुरू होत आहे. शनिवारपासून देशातील बहुतांश भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे, तर महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या भागांत 4 मेपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मे महिना उजाडताच संपूर्ण देशातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे वार्‍यांचा वेग वाढला असून, जम्मू-कश्मीर ते राजस्थानपर्यंत जोरदार वारे वाहत आहेत. तेथे ताशी 60 ते 70, तर महाराष्ट्रात ताशी 30 ते 35 इतका वेग आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने बहुतांश भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही चार मेपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होत असून, विदर्भात चार मे, तर मराठवाड्यात पाच मेपासून पावसाला प्रारंभ होत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही.

दोन मॉडेलचे दोन अंदाज

दरवर्षी मान्सून अंदमानात 20 ते 21 मेदरम्यान येतो. एका मॉडेलच्या अंदाजानुसार तो 14 ते 19 मे, तर दुसर्‍या मॉडेलच्या अंदाजानुसार तो 21 ते 25 मेदरम्यान अंदामान-निकोबार बेटांवर दाखल होईल.

उत्तर भारतात जास्त; महाराष्ट्रात कमी पाऊस का?

अजून अरबी समुद्रातून बाष्पवहनाच्या वेगाला बळकटी नाही. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही. फक्त विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याच्या तामपानात घट होण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी महाबळेश्वर येथे 30.2, नाशिक 36.5, पुणे 37.7, सातारा 37 अंशांपर्यंत पारा खाली आला होता.

शनिवारचे कमाल तापमान

चंद्रपूर 44, वर्धा 44, नागपूर 43.4, अमरावती 43.4, यवतमाळ 42, पुणे 37.7, जळगाव 41.5, कोल्हापूर 35.5, महाबळेश्वर 30.2, मालेगाव 42.8, नाशिक 36.5, सांगली 37.8, सातारा 37, सोलापूर 40.8, धाराशिव 42.2, छ. संभाजीनगर 42.8, मुंबई 34.8, रत्नागिरी 33.9, डहाणू 36.3.

ही आहेत मान्सूनपूर्व पावसाची लक्षणे...

* गुजरात, राजस्थानमधील धुळीची वादळे-उत्तर भारतातील पाऊस यांचा संबंध मान्सूनपूर्व पावसाशी जोडला जातो. ती सर्व लक्षणे एक मेपासून दिसत आहेत.

* वार्‍यांचा वेग देशभरातील विविध राज्यांत वाढला असून, तो उत्तर भारतात ताशी 60 ते 70 कि.मी., तर महाराष्ट्रात ताशी 30 ते 35 कि.मी. असा आहे.

* पहाटे आणि रात्री गार वारे सुरू झाले आहे.

* राज्यात वार्‍यांचा वेग वाढल्याने कमाल तापमानात घट झाली असून, विदर्भाचा पारा 46 वरून 44, तर उर्वरित भागांत 42 वरून 37 ते 38 अंशांपर्यंत खाली आला आहे.

* उत्तर भारतात गारपीट, तर राजस्थान, गुजरातमध्ये 4 मेपासून धुळीचा, वादळांचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news