

पुणे; आशिष देशमुख : गत चार ते पाच दिवसांत वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे. हवेचे दाब, समुद्राचे तापमान आणि वार्यांची दिशा त्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
सॅटेलाईट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे.अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे.