खडकवासला धरणसाखळीत मान्सून सक्रिय

गेल्या चोवीस तासांत पाणीसाठ्यात 0.15 टीएमसीची वाढ; मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा
Photograph of Khadakwasla Dam catchment area taken on Saturday afternoon
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे शनिवारी दुपारी टिपलेले छायाचित्रदत्तात्रय नलावडे

खडकवासला : पुणे शहरासह जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांची तसेच 66 हजार हेक्टर शेतीची तहान भागविणार्‍या खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव खोर्‍यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासांत धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात 0.15 टीएमसी वाढ झाली आहे.

रायगड जिल्ह्यालगतच्या धरणखोर्‍यात रिमझिम वाढली आहे. मात्र, अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शनिवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 3.87 टीएमसी म्हणजे 13.27 टक्के पाणीसाठा झाला होता. शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 3.72 टीएमसी पाणी होते.

Photograph of Khadakwasla Dam catchment area taken on Saturday afternoon
धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा लपंडाव ; खडकवासला साखळीत 20.76 टक्के पाणीसाठा

पिकांना जीवनदान

मान्सून सक्रिय झाल्याने टेमघर, पानशेत, वरसगाव धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ सुरू आहे. खडकवासला धरणातही पाण्याची आवक सुरू आहे. मात्र, पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने खडकवासलाची पातळी कायम आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत पानशेत धरणात 1.77 टीएमसी (16.63 टक्के), वरसगावमध्ये 1.24 टीएमसी (9.65 टक्के), तर टेमघरमध्ये 0.03 टीएमसी (0.93 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता, तर खडकवासला धरणात 0.82 टीएमसी (41.71 टक्के) इतके पाणी आहे.

शिरकोली येथील शेतकरी नामदेव पडवळ म्हणाले, ‘डोंगरी पट्ट्यात यंदाच्या हंगामात प्रथमच चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे भात, नाचणी पिकांच्या रोपांना जीवनदान मिळाले आहे.'

पानशेत, वरसगाव खोर्‍यात अधूनमधून पावसाच्या सरी

शनिवारी दिवसभरात सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत वरसगाव येथे 15, तर पानशेत येथे 13, टेमघर येथे 9 व खडकवासला येथे 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकण घाट माथ्यालगतच्या पानशेत, वरसगाव खोर्‍यात शुक्रवारी सायंकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा रिमझिम सुरू होत आहे.

शुक्रवारपेक्षा शनिवारी संध्याकाळी पानशेत खोर्‍यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जोरदार पावसाची आशा आहे.

मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news