बारामती : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे गळितासाठी ऊस जाळून आणल्यास बिलातून कपात करण्याचा निर्णय कारखाना संचालक मंडळाने घेतला असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. तोडणी वाहतूक यंत्रणेने ऊस जळीत करून आणल्यास तोडणी वाहतूक यंत्रणेच्या बिलातून 200 रुपये प्रतिटन कपात करण्यात येतील, तर सभासद, शेतकर्यांच्या सहमतीने ऊस जळीत करून कारखान्याकडे गाळप करण्यास आणल्यास शेतकर्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन 50 रुपयेप्रमाणे कपात करण्यात येणार आहे.
कपातीचे नुकसान टाळण्यासाठी सभासद शेतकर्यांनी आपला चांगला ऊस जाळण्यास परवानगी देऊ नये. कारखान्याकडे नोंद केलेल्या सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे, असेही जगताप यांनी सांगितले.
सध्या ऊसतोड कामगारांकडून ऊसतोडणीसाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी कारखाना प्रशासनाकडे येत असून, पैशाची मागणी झाल्यास त्याची लेखी तक्रार कारखान्याकडे द्यावी. याची चौकशी करून ऊसतोड यंत्रणेने घेतलेल्या पैशाची कपात त्यांचे ऊसतोडणी वाहतूक बिलातून कपात करून सभासद शेतकर्यांना परत केले जातील,असेही जगताप यांनी सांगितले. जगताप म्हणाले की, कारखान्याने पुढील हंगामाकरिता सुरू लागणीस 150 रुपये प्रतिटन व खोडव्यासाठी 150 रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. पुढील हंगामाच्या तुटणार्या उसासाठी लागू असेल.
निरा डावा कालव्याचे आवर्तन कारखान्याचे मार्गदर्शक व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योग्य नियोजनामुळे व सहकार्यामुळे जून अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याने शेतकर्यांनी सुरुच्या लागणी व तुटणार्या उसाचे खोडवे राखण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 121 दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 7500 मे.टन एवढी असताना सरासरी प्रतिदिन 9 हजार मे. टनाने गाळप करत एकूण 10 लाख 84 हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी 11.74 टक्के साखर उतारा राखत 12 लाख 67 हजार 650 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील आडसाली 7 लाख 6 हजार मे.टन, पूर्वहंगामी 1 लाख 13 हजार मे.टन, सुरु 13,995 मे.टन, खोडवा 65,426 मे.टनाचे गाळप केले असल्याची माहिती जगताप यांनी दिली.
चालू हंगामामध्ये 1 मार्चपासून ते हंगाम संपेपर्यंत तुटणार्या उसास प्रति.मे.टन 150 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे मार्चपासून तुटणार्या उसास प्रति.मे.टन 3,150 रुपये असे एकरकमी ऊस बिल सभासद शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
– पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना.
हेही वाचा