Pune Election Code of Conduct Impact: आचारसंहितेत अत्यावश्यक निर्णय कसे घ्यायचे? महापालिकेचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

स्थायी समिती बैठकांबाबत दिले पत्र
PMC
PMCPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. या कालावधीत स्थायी समितीची बैठक घेता येईल का? तसेच कोणत्या विषयांवर निर्णय घेण्यास परवानगी असेल, याबाबत महापालिकेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमार्फत विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर महापालिकेची स्थायी समिती, सर्वसाधारण सभा तसेच विविध विशेष समित्यांचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन प्रशासकीय आणि विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

PMC
Pune Politics: पुण्यात काँग्रेसने ‌‘भाकरी फिरवली‌’; पूर्व-पश्चिमसाठी स्वतंत्र शहराध्यक्ष

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समितीची बैठक महिन्यातून किमान एकदा घेणे बंधनकारक आहे. आर्थिक विषयांवरील अनेक महत्त्वाचे निर्णयही या समितीमार्फत घेतले जातात. गुरुवारी (21 मे) स्थायी समितीची बैठक पूर्वनियोजित होती. मात्र, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ती तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पुढील दोन महिन्यांत शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने विविध नागरी कामांना मंजुरी देणे आवश्यक आहे.

PMC
Municipal Electricity Waste: रिकाम्या केबिनमध्ये एसी, लाइट, फॅन सुरूच! अतिरिक्त आयुक्तांच्या वीजबचतीच्या आदेशाला अधिकाऱ्यांकडूनच हरताळ

त्याचबरोबर पावसाळापूर्वीची तयारी, नालेसफाई, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचण्याच्या समस्या तसेच नव्याने समाविष्ट गावांमधील नागरी सुविधांसंदर्भातील प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेने पत्रात नमूद केले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमित बैठका संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने घेता येतात. त्यामुळे केवळ अत्यावश्यक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची बैठक घेण्यास परवानगी मिळू शकते का? तसेच त्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबावी, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्याची विनंती महापालिकेने केली आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यावर काय निर्णय दिला जाणार, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

शहरात पावसाळापूर्वीची अनेक कामे तातडीने करणे आवश्यक आहे. नालेसफाई वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरही विविध कामांना मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात कोणत्या प्रकारचे निर्णय घेता येतील, याबाबत मार्गदर्शन मागण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

- श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news