Madhuri Misal News: नगरसेवक सतीश मिसाळ यांच्या आकस्मिक निधनानंतर राजकीय वारशाची जबाबदारी खांद्यावर घेऊन नगरसेवकपदापासून सुरू केलेली आमदार माधुरी मिसाळ यांची राजकीय कारकीर्द थेट राज्यमंत्रिपदापर्यंत पोहोचली. सलग चार वेळेस विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याच्या त्यांच्या कौशल्याने त्यांच्या मंत्रिपदाचा मार्ग सुकर झाला.
स्वातंत्र्यसेनानी केशवराव देशपांडे यांची नात असलेल्या पन्नास वर्षीय माधुरी मिसाळ यांंनी बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे पती स्व. सतीश मिसाळ यांच्या रूपाने राजकीय वारसा मिळाला. ते सलग चार टर्म नगरसेवक होते. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाबरोबरच राजकीय वारशाची जबाबदारी मिसाळ यांच्या खाद्यांवर पडली.
2007 च्या महापालिका निवडणुकीत कसबा पेठेतून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. अवघ्या अडीच वर्षांत पर्वती विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. त्या विजयी झाल्या, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
दरम्यानच्या काळात त्यांनी प्रदेश भाजप सचिव, लोकलेखा समिती सदस्य, भाजप शहराध्यक्ष, विधानसभा प्रतोद अशा पदांवर काम केले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला. पश्चिम महाराष्ट्रातून सलग चौथ्यांदा विजयी होणार्या त्या एकमेव महिला आमदार ठरल्या. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल, असे निश्चित मानले जात होते. अखेर भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली.विमानतळावर उतरले
अन् मंत्रिपदाची खूशखबर
सकाळी मी विमानातून नागपूर विमानतळावर उतरले. त्याचवेळी मला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॉल आला आणि तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, असे त्यांनी सांगत मला मंत्रिपदाची गुड न्यूज दिली, असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
राज्यमंत्रिपदाचा विस्तार असल्याने आमदार मिसाळ ह्या सकाळीच पुण्यातून नागपूरला रवाना झाल्या होत्या. त्या विमानात असतानाच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडून त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, नेटवर्क नसल्याने मिसाळ यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे मिसाळ यांच्या स्वीय सहायकांना निरोप दिला.
दरम्यान, मिसाळ सकाळी नागपूर विमानतळावर उतरल्यावर लगेचच त्यांना बावनकुळे यांचा कॉल आला आणि त्यांनी मंत्रिपदाची गोड बातमी दिली. या वेळी मिसाळ यांच्या समवेत त्यांचे दीर बाबा मिसाळही होते. दरम्यान, मिसाळ यांचे मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह कार्यकर्त्यांनी नागपूरला धाव घेतली आणि मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळताच पेढे वाटले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळात शहरातील पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी जल्लोष करण्यात आला.
फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर व समन्वयक सागर भोसले यांनी फुलबाजारातील अडते, हमाल, खरेदीदारांसह अन्य बाजार घटकांना पेढे भरवून मंत्रिपदाचा आनंद व्यक्त केला.
आशिया खंडातील क्रमांक एकची बाजार समिती, असा नावलौकिक असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी, फळे, फुले, गूळ-भुसार, केळी बाजार पर्वती विधानसभा मतदारसंघात येतो. येथून निवडून आलेल्या आमदार मिसाळ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने येत्या काळात बाजारातील सर्व अडचणी सुटून अन्य प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास असोसिएशनचे अध्यक्ष वीर यांनी व्यक्त केला.