

Babaji Kale Criticism Dilip Mohite Patil Pune Political News
खेड : त्यांना पराभव पचनी पडला नसून, झोप लागत नाही. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी पोटनिवडणूक होण्याची स्वप्ने ते पाहत आहेत, असा टोला खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाव न घेता शिवसेनेचे (उबाठा) आमदार बाबाजी काळे यांनी लगावला.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राजगुरुनगर नगरपरिषदेच्या वतीने शहरात १० रुपयांत कापडी पिशव्यांचे एटीएम मशिन ही सेवा सुरू केली आहे. माजी सरपंच शांताराम घुमटकर यांच्या हस्ते व आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, अनिलबाबा राक्षे, शिवाजी मांदळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ५) या एटीएम मशिनचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी झालेल्या स्वागत समारंभात आमदार काळे बोलत होते.
सुधाताई कोठारी, रेखाताई श्रोत्रीय, मनोहर सांडभोर, नीलेश घुमटकर, किशोर ओसवाल, मंगेश गुंडाळ, ॲड. दीपक थिगळे, मुख्याधिकारी अंबादास गरकळ तसेच शहरातील नागरिक या वेळी उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या कार्यक्रमात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भाषण केले. त्यात शहराला नगरपरिषद लागू करण्यापासून ते विविध विकासकामे केल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच पाणी, कचरा, सांडपाणी या प्रलंबित व चुकीच्या कामाबद्दल प्रशासनाला जबाबदार धरत टिप्पणी केली. ते पुढच्या कार्यक्रमाला गेले आणि त्यानंतर आमदार काळे बोलायला उभे राहिले. त्यांनी सुरुवातच एकेरी उल्लेख करून केली. आता गेलेला माणूस प्रचंड खोटारडा आहे. अशा माणसाला तालुक्याने १५ वर्षे कसे सहन केले? असा प्रश्न उपस्थित केला. माझ्या व्यक्तिगत व्यवहारात लक्ष घालतो. माझी कर्जे फेडणार आहे का? तुमच्या कुटुंबातील सर्वांनी पुनर्वसन जमिनी खरेदी-विक्री केल्या, त्याचीही माहिती समोर आणणार आहे. राजगुरुनगर शहरात २५ वर्षे राहिला, सत्ता उपभोगली; मग शहरातील कचरा, पाणी, सांडपाणी प्रश्न का सुटले नाहीत? त्यांनी टक्केवारी घेऊन निकृष्ट कामे केली.
मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर नगरपरिषद आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.