पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांमधील अंतर कमी व्हावे, यासाठी खोपोली कुसगाव येथे उभारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’चे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा पूल मे 2025 पासून पूर्णत: वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
मुंबई ते पुणेदरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. यादरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांना मात्र नेहमीच वाहतूक कोंडीचा फटका बसत असतो. त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होतात. वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे ते मुंबई हे अंतर कमी व्हावे, यासाठी मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कूसगावपर्यंत दुहेरी बोगदा तयार होत आहे.
द्रुतगती महामार्गावरील 13.3 किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टिकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर 180 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे.
दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकेचे बोगदे तयार होत आहेत. यातील एका बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर एवढी आहे. तसेच एका बोगद्याची लांबी 1.67 किलोमीटर एवढी आहे. या बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून, आता फक्त बोगद्याच्या अंतर्गत भागातील यंत्रणेची कामे जलदगतीने सुरू आहेत. या बोगद्यांची जोडणी मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेला देण्यासाठी खोपोलीच्या दिशेने दोन पुलांची उभारणी केली जात आहे. यातील 1.8 किलोमीटर लांबीचा पूल पूर्ण झाला आहे, तर 950 मीटर लांबीच्या केबल स्टेड प्रकारातील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे 60 ते 65 टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबरअखेरपर्यंत राहिलेले काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.