नसरापूर (पुणे): पुढारी वृत्तसेवा - भोर तालुक्यातील एका गावात २५ महिने वय असलेल्या बालिकेवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या अत्याचार प्रकरणी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजगड पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. (Pune Crime)
शेजारच्या सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील पोलीस ठाण्याचे हद्दीत अशीच घटना सोमवारी उघडकीस आली असतानाच पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीत पुणे - सातारा महामार्गावरील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.१७) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच राजगड पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र यावेळी आरोपीने पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माहिती अशी की, दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून महामार्गलगत असणाऱ्या एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलाने हे शेजारी राहत आहेत. दोन वर्षीय मुलगी संबंधित मुलाकडे खेळायला जात असे. लहान मुलीची आई सकाळी कपडे धुत असताना मुलाने मुलीला त्याच्या खोलीत घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईने बंद असलेल्या खोलीकडे धाव घेऊन दरवाजा प्रयत्न केला. पण, मुलाने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर मुलगा मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला होता.
मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.