

कोंडीभाऊ पाचारणे
खेड : खेड तालुक्यातील पश्चिम भागात निसर्गाचा खजिना आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये लाल माती, मुरूम, दगड आणि डबर मिळण्याच्या अनेक जागा आहेत. बहुतांश आदिवासी भाग तसेच वन विभागाच्या क्षेत्रात उत्खनन केले जात आहे. 1 हजार 500 रुपये देऊन ट्रकमध्ये भरलेल्या मातीची विक्री करताना 15 हजार रुपये मिळतात. मुरूम, दगड यांच्याबाबतीत देखील असेच होत आहे. या खेळत्या पैशामुळे खेड तालुक्यात सध्या राजकीय वरदहस्त असलेल्या भाईंची चलती आहे.
शहरी भागात होणारी मोठमोठी बांधकामे, वीटभट्टी आणि इतर भराव करण्यासाठी अशा मालाला मोठी मागणी आहे. म्हणूनच खेड तालुक्यात अवैध उत्खनन, वाहतूक करण्यासाठी मोठी स्पर्धा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील गावोगावी दहशतीचे स्तोम माजले आहे. कमी वेळेत आणि कमी कष्टात अधिकचा पैसा मिळतो. पैसा आला की सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. दहशत, दादागिरी करून सहज व झटपट मोठे होता येते. हे सारे जिथे शक्य आहे, त्या खेड तालुक्यात म्हणूनच भाईंची क्रेझ वाढली आहे.
खेड तालुक्यात चाकण व सेझ परिसरात असलेल्या एमआयडीसीमधील कंपनी क्षेत्रात फार मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनात आपला अधिकारी असावा म्हणून वरिष्ठ स्तरावर हालचाली होतात. इथली प्रशासकीय खुर्ची मिळवताना अधिकार्यांना मोठ्या तडजोडी कराव्या लागतात. स्थानिक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य ते वरिष्ठ अधिकारी अशा सगळ्यांची टक्केवारी द्यावी लागते. अधिकार प्राप्त झाले की वसुली करताना मात्र गुंडांच्या टोळ्यांचा सामना करावा लागतो. काही कारवाईत आजी-माजी नेत्यांचा नाहक हस्तक्षेप होतो. महसूल, पोलिस आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी निर्भयपणे काम करावे, अशी स्थिती तालुक्यात कधीच होणार नाही, असे त्यामुळे म्हटले.
भाईगिरी करून जेवढ्या स्पीडने मोठे होता येते, तेवढ्या स्पीडने कष्टाने मोठे होता येत नाही. त्यामुळे शिक्षण, करिअर किंवा पालक, नातेवाईक सांगतील ते करण्यापेक्षा अनेक मुले भाईंच्या मागे फिरताना खेड तालुक्यात दिसत आहेत. यातल्या काही भाईंना बड्या राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे, तर काही राजकीय व्यक्ती आपले अस्तित्व निर्माण करून ते वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अशा भाईंची उघडपणे मदत घेत आहेत. सत्ता आणि मनगटशाही एकत्र येऊन सुरू असलेल्या या जीवघेण्या स्पर्धेत कुणाचा कुठे गेम होईल, याचा नेम राहिलेला नाही. असे वातावरण खेडच्या सामाजिक पटलावर दिसून येत आहे. त्याचा अनुभव आणि परिणामही जाणवू लागला आहे. (समाप्त)