Weather Update News: बंगालच्या उपसागरात सोमवारी अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती तयार झाली आहे. तर हिमालयात 29 पासून पश्चिमी चक्रावात सक्रिय होत आहे. अशा परस्परविरोधी वातावरणामुळे विचित्र हवामान तयार होत आहे. त्यामुळे बोचरी थंडी अन् बाष्पयुक्त वारे राज्यात वाहणार आहे. त्यामुळे डिसेंबरची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होईल, असा नवा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने डिसेंबरमध्ये कमी थंडीचा अंदाज रविवारी दिला होता. मात्र सोमवारी दुपारी देशाच्या वातावरणात मोठा बदल झाला. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्याने दक्षिण व पूर्व भारतात अनुक्रमे 26 ते 29 दरम्यान तुुफान पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे हे वारे वेगाने येत आहे.
तर हिमालयात थंडी बळकट करणारा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने डिसेंबरमध्ये हिमयुग अवतरल्यासारखे वातावरण राहणार आहे. उत्तरेतून थंडी अन् दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे. त्याची सुरुवात 29 नोव्हेंबरपासून होईल. मात्र थंडीची तीव—ता 1 डिसेंबरपासून वाढणार असल्याचा अंदाज आहे.
सोमवारचे राज्याचे किमान तापमान...
महाबळेश्वर 12, नाशिक 12, पुणे 12.1, जळगाव 12.4, छ. संभाजीनगर 12.5, परभणी 12.7, सातारा 13.8, मालेगाव 13.6, गोंदिया 12.5, नागपूर 13, वर्धा 13.8, कोल्हापूर 16.7, सांगली 15.7, सोलापूर 15.6, धाराशिव15.4, अकोला 14, अमरावती 15.5, बुलढाणा 14.3, ब्रम्हपुरी 13.1, चंद्रपूर 14.8, मुंबई 23, रत्नागिरी 21.1