पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाला कागदपत्रे, जबाब पाठवले होते. या पार्श्वभूमीवर ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून आज मंगळवारी (दि. 15) या प्रकरणाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत तिन्ही चौकशी समित्यांच्या अहवालांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर कारवाईची नेमकी दिशा ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांना पैशांअभावी उपचार न मिळाल्याने रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. महिलेबाबत नेमके काय घडले? याची चौकशी करण्यासाठी शासनातर्फे तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागाची समिती, धर्मादाय सहआयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचा समावेश आहे. तिन्ही समित्यांचे अहवाल शासनाला सादर केले आहेत.
पुणे पोलिसांनी याबाबत भिसे कुटुंबीयांसह दीनानाथ रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर या सर्व रुग्णालयांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी सर्व रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचार्यांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.
सर्व माहिती संकलित करून ससून रुग्णालयातील समितीला सादर करण्यात आली आहे. ससूनमधील वैद्यकीय समिती सर्व कागदपत्रांची पडताळणी करून काय निष्कर्ष मांडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत. काही त्रुटी आढळून आल्यास उर्वरित कागदपत्रे मागवली जातील. समितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांचा समावेश आहे.
- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय