येरवडा: विमाननगर परिसरातील यमुनानगरमध्ये महापालिकेच्या दवाखान्यात वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) गेले पाच महिन्यांपासून पडून आहे. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. दवाखान्यात उपचारासाठी येणारे रुग्ण, तसेच या ठिकाणी काम करणारे डॉक्टर आणि कर्मचार्यांच्या आरोग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हा कचरा तातडीने उचलण्याची मागणी होत आहे.
यमुनानगर येथे 2022 मध्ये महापालिकेने वस्ती क्लिनिक सुरू केले आहे. तीन वर्षे होऊनही या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणीदेखील या दवाखान्यात उपलब्ध नाही. मागील अनेक दिवसांपासून इंटरनेट सेवाही बंद आहे. दवाखान्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
या रुग्णालयात एक डॉक्टर, तीन नर्स, एक सहायक कर्मचारी कार्यरत आहेत. दररोज उपचारासाठी सुमारे 40 ते 50 रुग्ण येत असतात. दर मंगळवारी आणि गुरुवारी बालकांना या ठिकाणी लसीकरण करण्यात येते. या लस शास्त्रीनगर येथील गलांडे रुग्णालयातून सकाळी आणाव्या लागत आहेत, कारण या दवाखान्यात लस साठवणूक करण्याची सुविधाच उपलब्ध नाही.
दवाखान्याच्या छतावर गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा पडून आहे. तसेच वैद्यकीय कचरा एका खोलीत ठेवण्यात आला आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे या ठिकाणी उपचारासाठी येणारे रुग्णांसह वैद्यकीय कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैद्यकीय कचरा उचलला जात नसल्यास आम्हाला कुणावरही कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. याबाबत मुख्य खात्याकडून कारवाई केली जाते. हा कचरा उचलण्यासाठी लवकरच मुख्य खात्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल.
-डॉ. अमित शहा, वैद्यकीय अधिकारी, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय