

वडगाव मावळ: टाकवे बुद्रुक (ता. मावळ) येथे अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी ५१ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, वडगाव न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बाळू असवले (वय ५१, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टाकवे बुद्रुक गावातील एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या एका दूध डेअरीमध्ये ही घटना घडली.
याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर तसेच महिला पोलिस उपनिरीक्षक महेश्वरी पाटील करत आहेत.
दरम्यान वडगाव मावळ येथे दोन दिवसांपूर्वी शौर्य ॲकॅडमीच्या प्रशिक्षकाने महिला पोलिस प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर लगेचच टाकवे बुद्रुक येथे दोन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना घडली. त्यामुळे मावळ तालुक्यात संतप्त पडसाद उमटत आहेत.