

Indian Institute of Tropical Meteorology Roxy Mathew Koll Research
आशिष देशमुख
पुणे : भारताच्या प्रादेशिक हवामानात मोठे बदल होत असून, राज्यवार हे वेगवेगळे आहेत. यात महाराष्ट्राबाबत तज्ज्ञांनी वेगळे निष्कर्ष नोंदवले आहेत. यापुढे वारंवार मराठवाडा अन् विदर्भ हे भाग अतिवृष्टीचे हॉटस्पॉट राहणार आहेत. कोकणातील समुद्राची पातळी वाढणार असून, उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी अन् अवर्षण असे विचित्र हवामान राज्यात यापुढे दिसणार असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेट्रोलॉजी (आयआयटीएम) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल हे सध्या पॅरीस येथील जागतिक हवामान परिषदेत आहेत. यांच्यासह हवामान शास्त्रज्ञ चिराग धारा, अदिती देशपांडे, पद्मिनी दलपदाडो, मंदिरा सिंग यांनी भारतातील हवामानावर राज्यवार प्रथमच सखोल संशोधन करत हवामानाचा प्रादेशिक ताळेबंदच सादर केला आहे. त्यांचे हे संशोधन डोळे उघडणारे असून दिशादर्शक आहे. देशाच्या प्रत्येक राज्याबाबत त्यांनी सखोल निरीक्षणे मांडली असून, महाराष्ट्राबाबत विशेष टिप्पणी खास पुढारीसाठी पॅरीस येथून पाठवली आहे.
सुचवलेले उपाय...
* स्थानिक पूर्वसूचना प्रणाली मजबूत करणे
* उष्णतेसाठी तयार शहरे बांधणे
* किनारी भागांसह ग्रामीण समुदायांचे संरक्षण करणे हे उपाय येत्या काळात महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरतील.
महाराष्ट्राबाबत डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांची निरीक्षणे...
* भारताच्या बदलत्या हवामानाच्या तीव्र झळा आताच महाराष्ट्राला जाणवत आहेत. त्याची झलक यावर्षी दिसत आहे.
* राज्यात उष्णतेच्या तीव्रतेत स्पष्ट वाढ; उन्हाळ्याच्या दीर्घ आणि अधिक तीव्र लाटांत वाढ होणार आहे.
* अरबी समुद्रात जलद तापमानवाढ दिसून येत आहे. त्यामुळे तीव्र चक्रीवादळे आणि किनारी भागांत मुसळधार पावसात वाढ झाली आहे.
* मध्य भारत, ज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश आहे. हे दोन भाग प्रामुख्याने अतिवृष्टीच्या घटनांसाठी हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत.
* कोकणपट्ट्यात समुद्राची पातळी वाढत आहे. वारंवार येणार्या सागरी उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे.
* त्यामुळे कोकणातील मत्स्यव्यवसाय आणि किनारी उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो.
* हे बदल भविष्यात उष्णता, मुसळधार पाऊस आणि पाण्याचा ताण एकत्रितपणे येऊ शकतात.
विचित्र हवामान बदलाची कारणे...
* मानवी क्रियाकलापांमुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण जास्त वाढले.
* हिंदी महासागरातील तापमान वाढीमुळे बर्फ वितळण्याचा व समुद्र पातळी वाढीचा दर वाढला.
* सन 2011 ते 2020 मध्ये जागतिक पृष्ठभागाचे तापमान सन 1850 ते 1900 पेक्षा 1.1 अंशाने वाढले आहे.