अभिजात दर्जामुळे देशभरातील 450 विद्यापीठांत मराठीचे अध्ययन शक्य

मराठीतून संशोधन करण्यास अधिक वाव
marathi language
मराठी भाषा Pudhari
Published on
Updated on

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीतून संशोधन करण्यास अधिक वाव मिळेल. मराठी ही ज्ञानभाषा होण्यास मदत होईल. देशभरातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल. तरुणांना मराठीकडे वळविण्यासाठी अनेक प्रकल्पही राबविता येतील, अशी प्रतिक्रिया लेखक - साहित्यिकांनी व्यक्त केली. मराठी भाषेला गुरुवारी अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याचे काय सकारात्मक परिणाम होतील, याबाबत दै. ‘पुढारी’ने त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. राजा दीक्षित (ज्येष्ठ साहित्यिक) : प्रत्येक मराठी व्यक्तीनेही आपली स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठीची शब्दसंपत्ती वाढवणे, ज्ञान-विस्फोटाच्या सध्याच्या युगात जे नवे ज्ञान जगभरात निर्माण होत आहे, ते मराठीच्या प्रांगणात आणणे, त्यासाठीची परिभाषा घडवणे, प्रमाणभाषेला बळकटी आणणे, मराठीच्या विविध बोली टिकवणे व त्यांचा विकास घडवणेे आणि इंग्रजीत शिकणार्‍या मराठी मुलांना घरामध्ये मराठी संस्कृती आणि मराठी भाषा यांच्या वातावरणात वाढवणे, हे सगळे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच यासंदर्भात मी स्वतः मराठीसाठी काय करतो / करते, याचा विचार प्रत्येक मराठी व्यक्तीने केला पाहिजे, असे मला वाटते.

लक्ष्मीकांत देशमुख (ज्येष्ठ साहित्यिक) : अभिजात दर्जासाठी केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी सातत्याने प्राप्त होईल. या दर्जामुळे भाषेतील अधिक संशोधन, प्रचार - प्रसार करता येईल. त्यासाठी शासनाने 100 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मी करतो. देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांचे एक प्रगत अध्ययन केंद्र सुरू करता येईल. निवडक विद्यापीठांमध्ये केंद्र सुरू केले तर अनेकांना मराठीचा अभ्यास करता येईल. सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करून मराठी भाषेच्या अध्ययनासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या दोन्ही गोष्टींसाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा. अभिजात दर्जामुळे मराठी ही ज्ञानभाषा होण्यास मदत होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news