Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शिरोली येथे रास्ता रोको

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शिरोली येथे रास्ता रोको

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिरोली (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारसह आमदार आणि खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर, बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे, संचालक हनुमंत कड, मंगेश सावंत, शंकर राक्षे, विकास ठाकूर, अंकुश काळे, दिलीप होले, अ‍ॅड. अनिल राक्षे, सुदाम कराळे, बबन होले, रामदास टोपे, नंदू वाडेकर, रवींद्र सावंत, तुकाराम सावंत, सतीश चांभारे, अरुण मुळूक, जिजाभाऊ मेदगे, केरभाऊ सावंत, विशाल टाकळकर, बारकू पवळे, धर्मेंद्र पवळे, महादू सावंत आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा महामार्गावर ठेवून पुष्पहार घालून रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात झाली.

पोलिस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक सागर खबाले, बी. एन. काबुगडे व पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तहसीलदार प्रशांत बेडशे यांनी आंदोलनस्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाची रेस्क्यू टीमची तुकडी व आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

महामार्गावर वाहतूक कोंडी

'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', अशा विविध घोषणा आंदोलकांनी दिल्या. मनोहर वाडेकर, मंगेश सावंत, विकास ठाकूर, अनिल राक्षे, शंकर राक्षे, हनुमंत कड यांची भाषणे झाली. तब्बल एक तास महामार्ग रोखून धरल्याने महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

'…तर मुख्यमंत्र्यांना शिवनेरीवर येऊ देणार नाही'

मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना शिवजयंतीला शिवनेरीवर येऊन देणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयीची अधिसूचना काढावी, त्यानंतरच शिवनेरीवर यावे. अधिवेशन बोलावून आरक्षणाचा कायदा पास करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news