पौड : मुळशी तालुक्यातील धडवली येथे शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनोरमा खेडकर (रा. नॅशनल हौसिंग सोसायटी, बाणेर, पुणे) हिच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पिस्तूल आणि लँड क्रुझर गाडी पौड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची मनोरमा ही आई आहे. मनोरमा खेडकरला १८ तारखेला न्यायालयात हजर केल्यानंतर तिच्याकडे असलेले पिस्तूल आणि वाहन तसेच इतर आरोपींना अटक करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.
त्याप्रमाणे मनोरमा खेडकरकडील पिस्तूल व लँड क्क्रुझर गाडी पौड पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर सकपाळ, पौडचे पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव यांच्या पथकाने केली.
पौड पोलिसांनी महाडमधून मनोरमा खेडकर हिला १८ जुलै रोजी अटक केली. त्या वेळी पौड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर जी. बरडे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर मनोरमा खेडकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
ती कोठडी शनिवारी संपल्यानंतर पुन्हा तिला न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मनोरमा खेडकरला २२ जुलैपर्यंत पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.