

पुणे : "आजच्या जागतिक व्यवस्थेत कोणताही देश स्वयंपूर्ण नाही. संरक्षणसिद्धतेसाठी एखाद्या देशावर सरसकट बंदी घालणे हा उपाय नसून, आपल्याला स्वदेशी संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे लागेल," असे स्पष्ट मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशात चांगले काम होत असले तरी, गेल्या अनेक वर्षांतील अवलंबित्व कमी करण्यासाठी वेळ लागेल, असेही ते म्हणाले.
ज्ञानप्रबोधिनी शाळेतर्फे आयोजित ‘रुप पालटू या’ व्याख्यानमालेत 'नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताची संरक्षण सिद्धता' या विषयावरील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी चीन-पाकिस्तान संबंध, अंतर्गत सुरक्षा आणि लष्करी आधुनिकीकरण यावर सविस्तर भाष्य केले.
चीनसोबतचा वाद हा सीमेपुरता मर्यादित असून, तो राजकीय चर्चेतून सुटेल; मात्र त्यासाठी वेळ लागेल, असे नरवणे म्हणाले. याउलट, पाकिस्तानसोबतचा वाद केवळ सीमेचा नसून तो दोन भिन्न विचारसरणींचा आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे, तर पाकिस्तान धर्मावर आधारित राष्ट्र असल्याने हा वाद लवकर सुटणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांवर बोलताना ते म्हणाले, "देशातील जातीय आणि धार्मिक भेदभावाचा फायदा परकीय शक्ती घेतात. बाह्य सुरक्षेसाठी लष्कर सज्ज आहे, पण अंतर्गत सुरक्षा ही सर्वांची मिळून जबाबदारी आहे." नक्षलवाद आणि ईशान्येतील घुसखोरी नियंत्रणात असली तरी धोका कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण उत्पादनासाठी खासगी क्षेत्राला संधी देणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, पण इंजिनासारखे महत्त्वाचे भाग देशातच तयार करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. "शांतता हवी असेल तर युद्धासाठी सज्ज राहावे लागते, पण युद्ध हा नेहमीच शेवटचा पर्याय असतो," या विचाराने त्यांनी आपल्या मुलाखतीचा समारोप केला.