मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर आणि सांगलीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता फेरी पुण्यात रविवारी (दि.11) दाखल होणार आहे. त्यानिमित्ताने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून, विविध क्षेत्रांतील मराठा बांधव या फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.
सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास सकाळी 11 वाजता अभिवादन केल्यानंतर फेरीला सुरुवात होणार आहे. बाजीराव रस्ता, शनिवारवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून बर्वे चौकातून फेरी जंगली महाराज रस्ताने पुढे जाणार आहे. डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर खंडूजी बाबा चौकात फेरीची सांगता होणार आहे.
फेरीमध्ये सहभागी होणार्या मराठा बांधवांना पार्किंगसाठी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अरणेश्वर कॅम्पसचे मैदान, मामलेदार कचेरी समोरील मैदान, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान, फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजीनगर पोलीस वसाहत परिसरातील वीर नेताजी पालकर विद्यालय, दत्तवाडी येथील क्रीडा निकेतन, नवी पेठेतील धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालय येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. फेरीच्या यशस्वी आयोजनासाठी दोन हजार स्वयंसेवक, मराठा सेवक कार्यरत राहणार आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सोलापुरची जनजागृती शांतता फेरी संपवुन कोल्हापुर मार्गे सातारा येथे शनिवारी पोहोचले होते. या फेरीनंतर आयोजित सभेला सलग एक तास संबोधित करताना त्यांची अचानक प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती अस्थाव्यस्त असतानाही मनोज जरांगे रविवारी सकाळी कात्रज मार्गे पुण्यात दाखल होणार आहेत.