

Manoj Jarange Patil
पुणेः मराठ्यांच्या संस्कारानुसार सरकारला वेळ दिला परंतु, गेल्या दीड वर्षात मराठा आरक्षणाबाबत काहीच केले नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दि. 29 ऑगस्ट 2023 ला आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला मोर्चाही काढला होता. मात्र त्यावेळी आश्वासन दिल्याने मुंबईपर्यंत न जाताच परत आलो होतो. यावेळी मात्र आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असून 29 ऑगस्ट रोजी थेट मुंबई गाठणार असून मी आणि मराठा समाज ओबीसीमधूनच आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आरक्षण देण्यासंदर्भात मराठा आणि कुणबी एक आहेत हा अध्यादेश काढण्यासाठी आधार लागतो हे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. त्यानुसार मराठवाड्याचे गॅजेटनुसार 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. सरकारने त्याचा आधार घेऊन आरक्षण देणे आवश्यक होते. त्याचबरोबर हैद्राबाद, सातारा आणि मुंबई गॅजेटचा ही आधार शासनाला घेता आला असता. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, असेच दिसत असल्याचा आरोप ही जरांगे यांनी यावेळी केला.
समाजाला विचारल्याशिवाय भुमिका नाही
आगामी काळात मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला खोट्या प्रतिष्ठा दाखवुन फसवणुक केली जात आहे. या निवडणुकीमध्ये काय भुमिका घ्यायची हे ठरलेले नाही. मात्र त्यापुर्वी आरक्षण पदरात घेणार असून मराठा समाजाला विचारल्याशिवाय कोणतीच भुमिका घेणार नाही, असे ही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.