

शिरूर/टाकळी भीमा: सक्त वसुली संचालनालयाच्या कारवाईमुळे (ईडी) गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात असलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर केल्याने त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल यांना जामीन मंजूर केला आहे.
शिरूर-हवेली मतदारसंघ आणि एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मंगलदास बांदल यांची आता राजकीय भूमिका काय राहणार? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. शिरूर-हवेलीच्या राजकारणात अनेकांची झोप उडविणारे बांदल पुन्हा एकदा खळबळ उडून देणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.
‘ईडी’ने 21 ऑगस्ट 2024 रोजी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी कारवाई करत साडेपाच कोटी रुपये जप्त केले होते. बांदल यांच्या 85 कोटी किमतीच्या मालमत्तांवरही ‘ईडी’ने टाच आणली आहे. मनिलाँड्रिंगसह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल केले आहेत.
यापूर्वीही शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी बांदल यांनी 21 महिने तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर ’ईडी’ने अटक केल्याने बांदल हे सहा महिन्यांपासून कारावास भोगत आहेत. बुधवारी (दि. 12) सायंकाळपर्यंत बांदल तुरुंगातून बाहेर येतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्यासमोर मंगळवारी (दि. 11) दुपारी 2:30 वाजता ज्येष्ठ वकील आबाद फोंडा यांनी बांदल यांच्यातर्फे युक्तिवाद केला. तदनंतर न्यायालयाच्या वेबसाइटवर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत वकिलांना उशिरापर्यंत मिळाली नाही. ती प्रत बुधवारपर्यंत मिळेल, असा अंदाज आहे.
- अॅड. आदित्य सासवडे