

मंचर: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मेथी पिकाचे बाजारभाव कडाडले आहेत. मेथीची जुडी तब्बल 44 रुपयांना विक्री झाल्याची माहिती मंचर बाजार समितीचे सभापती नीलेश स्वामी थोरात यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे बुधवारी (दि. 11) रात्री भाजीपाला लिलावाच्या वेळेस मे. आराध्या ट्रेडिंग कंपनी व गुरुकृपा ट्रेडिंग कंपनीचे राजूशेठ वाबळे व प्रशांत सैद यांच्या अडत गाळ्यावर कळंब येथील सिद्धेश संजय भालेराव या शेतकर्याच्या मेथीला सर्वाधिक उच्चांकी प्रतिजुडी रुपये 44 असा बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Latest Pune News)
मंचर बाजार समिती येथे चार तालुक्यांमधील शेतीमाल विक्रीसाठी येत असतो. कोथिंबिरीला प्रतिजुडी 21 रुपये व शेपू प्रतिजुडी 22 रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे तरकारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये विशेषतः धना, मेथी पिकाचे नुकसान झाले.
नुकसानीतून ज्या शेतकर्यांचे तरकारी माल वाचले, त्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. मागणी जास्त आहे; परंतु तरकारी मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे बाजारभाव कडाडल्याचे व्यापार्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकर्यांनी आपला भाजीपाला मंचर बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले.