कात्रज: सकाळी पावणेनऊची वेळ... ऑफिसची वेळ गाठण्यासाठी प्रत्येकाची धावपळ चाललेली... तलावात एका तरुणीने उडी मारली असे कोणीतरी ओरडले तर खरोखर एक मुलगी बुडत असल्याचे दिसले... लगेच त्यांनी उडी मारली आणि तिचा जीव वाचवला. कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात उडी मारून आत्महत्या करणार्या तरुणीसाठी देवदूत ठरलेल्या दशरथ तळेवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेलार मळा येथील रहिवासी असलेले तळेवाड हे वाहनचालक आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ते कामावर निघाले होते. नानासाहेब पेशवे तलावाजवळ येताच एका तरुणीने तलावात उडी घेतल्याचे त्यांना दिसले.
ते पाहून सुरक्षारक्षकांसह नागरिकांचा आरडाओरडा सुरू झाला. काही नागरिक पळून गेले. मात्र दशरथ यांनी मागचा पुढचा काही न विचार करता थेट तलावात उडी घेतली आणि बुडणार्या तरुणीला वर काढले. तेथील सुरक्षारक्षकांच्या साहाय्याने आणि तेथील बोटीच्या मदतीने तरुणीला काठावर आणले.
या वेळी एका पालिका कर्मचार्यालाही थोडी दुखापत झाली. मात्र दशरथ यांनी दाखवलेल्या साहसामुळे तरुणीला पुनर्जीवन मिळाले, त्याबद्दल स्थानिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या युवतीला कात्रज चौकी येथे आणून सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे यांनी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. तसेच सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
पेशवे तलावाजवळील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्याची गरज
कात्रज तलाव क्षेत्र मोठे आहे. पर्यटनाच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, पाटीलवाडा असे विकास प्रकल्प झाल्याने पर्यटक तसेच सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी नागरिक येतात. त्या तुलनेने सुरक्षारक्षकांची संख्या तोकडी आहे. या तलावात यापूर्वीही आत्महत्यासारखे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी श्रीराम कुलकर्णी यांनी केली आहे.