

पुणे / शिवनगर: बारामती तालुक्यातील दि माळेगांव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक (2025-26 ते 2030-31) कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घोषित केलेला आहे. कारखान्याच्या 21 संचालकांसाठी 22 जून रोजी मतदान होत आहे. मंगळवार, दिनांक 24 जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी गुरुवारी (दि.15) दिले आहेत.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सह संचालकांनी दिलेल्या पत्रान्वये कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती करण्याची विनंती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास केलेली आहे. (Latest Pune News)
त्यानुसार त्यांची नेमणूक प्राधिकरणाने केलेली आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग हवेली, जि. पुणे यांचे कार्यालय हे प्रशासकीय इमारत तहसीलदार बारामती यांचे कार्यालय, तळमजला, ता. बारामती, जि. पुणे हे आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सह संचालकांनी शिवनगर येथील (ता. बारामती) दि माळेगांव सहकारी साखर कारखान्याची प्रारुप मतदार यादी 20 जानेवारी 2025 आणि अंतिम मतदार यादी ही 17 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिध्द केलेली आहे. त्यानुसार, निवडणूक घेण्याकामी प्राप्त प्रस्तावानुसार निवडणूक कार्यक्रम मंजुरीचे आदेश प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी जारी केले आहेत.
निवडणूक कार्यक्रम:
निवडणूक कार्यक्रम बुधवार, दिनांक 21 मे रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानुसार, उमेदवारांसाठी अर्ज वाटप व स्वीकृती ही 21 मेपासून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात स्वीकारले जातील. 27 मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच रोजच्या रोज दुपारी चार वाजता प्राप्त होणारे उमेदवारीअर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केले जातील.
राजकीय घडामोडींना येणार वेग
सध्या पुणे जिल्ह्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक कधी जाहीर होणार? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले होते; मात्र आता माळेगाव कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.