बारामती: परप्रांतिय महिलेला रोजगार देतो असे सांगत बोलावून घेत तिला धाक दाखवून डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्याला स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुक्यातील पणदरे गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या खोलीतून पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली.
पोपट खामगळ (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला मूळची मध्यप्रदेशातील आहे. ती तळेगाव दाभाडे येथे पतीसह काम करत होती. कंपनीतील काम सुटल्याने तिचा पती गावी गेला होता. ती एकटीच असताना एका महिलेने तिची पोपट खामगळशी ओळख करून दिली. त्याचा हॉटेल व्यवसाय असून तेथे काम मिळेल असे तिला सांगितले. 15 हजार पगार ठरविण्यात आला.
त्यानुसार खामगळने तिला पणदरे येथे दि. 2 जानेवारी रोजी बोलावून घेतले. तेथे दि. 3 जानेवारी रोजी पत्र्याच्या खोलीत ही महिला झोपली असताना त्याने पहाटेच्या वेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास खून करेल अशी धमकी दिली. मी तुझ्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसे नेमली आहेत, पळून जायचा प्रयत्न केला तर नक्की खून करेन अशी धमकी त्याने तिला दिली. दि. 11 जानेवारीपर्यंत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेला सुद्धा शरीरसंबंधासाठी तयार कर, असे त्याने या पीडितेला सांगितले. पीडितेने त्याला नकार दिल्याने त्याने तिला मारहाण करत पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
जोडप्यातील एका महिलेच्या फोनवरून पीडितेने ही माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची सुटका केली. खामगळ याचेविरोधात लैंगिक अत्याचारसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगावचे सपोनि सचिन लोखंडे, कुलदीप संकपाळ, संध्याराणी देशमुख, देवा साळवे, अमोल खटावकर, अंमलदार अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे, गोदावरी केंद्रे यांनी केली.